पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्याने मद्यधुंद अवस्थेत सहकारी तरूणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी जामनेर येथे रूग्णवाहिका चालकाच्या रासलीला समोर आल्याच्या पाठोपाठ आता पहूरमध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पिडीत तरुणीने पहूर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्याद दिली आहे. यानुसार पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे हे काल दारूच्या नशेत ड्यूटी नसताना रुग्णालयात आले. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास रुग्णालयातच संबंधीत सहकारी कर्मचारी तेथे कार्यरत होती. रुग्णांची सुश्रुषा केल्यावर ती आराम कक्षात गेल्यावर डॉ. वानखेडे याने मद्यधुंद अवस्थेत आराम कक्षाचा दरवाजा ठोठावल्याने तिने दरवाजा उघडला. यानंतर डॉ .वानखेडे याने माझ्या पत्नीचा वाढदिवस असल्याने मी रोस्टेड चिकन आणलेले असून तुम्हाला ते खावेच लागेल असा आग्रह धरला. तिने मात्र नकार दिला. तरी डॉ. वानखेडे याने खूप आग्रह केल्याने तिने पार्सल घेत आतून दरवाजा बंद केला. तरीही डॉ. वानखेडे याने घरी न जाता रुग्णालयातच थांबून तिला फोन करून व्हॉटसअॅप वर येण्याचे सांगीतले व फोन कट केला.
यानंतर डॉ. वानखेडे याने संबंधीत सहकारी महिलेने व्हॉटसअॅप उघडताच डॉ. वानखेडे याने आपण मद्य आणले असून ते घेण्यासाठी तिला पुन्हा आग्रह केला. परंतु तिने वारंवार व्हॉट्स अॅपवर नकार दिला. यानंतर डॉ. वानखेडे याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या तरूणीने लगेचच सदर घटनेबाबत डॉ. संदीप कुमावत व वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधला. थोड्या वेळानंतर डॉ. कुमावत हे दवाखान्यात येऊन त्यांनी परिचारक दीपक वाघ यांच्या मदतीने मद्यधुंद डॉ. वानखेडे यांस दवाखान्याच्या बाहेर काढून मुख्य गेट बंद केले.
या घटनेबाबत पहूर पोलिस ठाण्यात पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे पहूर परिसरात संताप व्यक्त होत आहे.