चक्कर येऊन पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ३६ वर्षीय तरुण हा औषध घेण्यासाठी घरून जात असतांना अचानक चक्कर येऊन पडल्याची घटना घाणेकर चौकाजवळ असणाऱ्या चौबे विद्यालयाजवळ घडली. शासकीय रुग्णालयात त्याला मयत घोषित करण्यात आले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धीरज सुधाकर सोनवणे (वय ३६, रा. मारोतीपेठ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धीरज सोनवणे हा तरूण आपल्या आईवडील, पत्नी, १ मुलगा यांच्यासह राहत होता. भंडारी कन्स्ट्रक्शन येथे तो अकाउंटंट म्हणून काम करीत होता. त्यांची पत्नी या ७ महिन्यांची गरोदर असून त्या माहेरी गेल्या आहेत. धीरज हे शनिवारी २७ जुलै रोजी सकाळी घरी असताना त्यांना ऍसिडिटीचा त्रास होऊ लागला. म्हणून ते औषध आणण्यासाठी गेले होते.

चौबे विद्यालयाजवळ आले असताना अचानक धीरजला चक्कर आली. त्यात तो जमिनीवर कोसळला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तरूणाच्या अचानक मृत्यूमुळे परिसराह हळहळ व्यक्त केली जात आहे.