मुंबई : वृत्तसंस्था । मास्क न लावता रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांपैकी पोलिसांच्या हाती लागलेल्या एका आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे
कोरोनाची रुग्णसंखया वाढलीय म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. मात्र या संचारबंदीत रस्त्याच्या मधोमध क्रिकेटचा डाव मांडणे मुंबईतील तरुण क्रिकेटपटूंना चांगलेच महागात पडले. या तरुणांनी संचारबंदीचे उल्लंघन करण्याबरोबरच तोंडावर मास्कही लावला नव्हता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. यातील 20 वर्षीय तरुणाने जामिनासाठी केलेला अर्ज मुुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आरोपी तरुणांनी कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे तसेच संचारबंदीचे पालन केलेले नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजित नांदगावकर यांनी हा निकाल देताना नोंदवले.
जामिनासाठी अर्ज करणारा मोहम्मद कुरेशी हा त्याच्या सहा मित्रांसह उपनगरातील एका रस्त्याच्या मधोमध क्रिकेट खेळत होता. या तरुणांनी पोलिस आपल्या दिशेने येत असल्याचे कळताच तेथून धूम ठोकली. पळून जाताना ते रस्त्याच्या आसपास आपले मोबाईल विसरून गेले होते. ते आपले मोबाईल घेण्यासाठी आले, तेव्हा एका पोलिसाच्या हातात मोबाईल दिसले. एका तरुणाने त्या पोलिसाच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसाला दुखापत झाली. संबंधित तरुणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा तसेच कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. कुरेशीचा मित्र बालगुन्हेगार असल्यामुळे त्याला समज देउन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. मात्र कुरेशीला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती. इतर आरोपी फरार झाले होते़ त्यामुळे कुरेशीने नियमित जामिनासाठी सत्र न्यायालयाचे दार ठोठावले होते.
राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेउन पोलिसांनी राज्यभर संचारबंदीचे कलम 144 लागू केले आहे. अशा परिस्थितीत तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर क्रिकेट खेळणे चुकीचे आहे. हे कृत्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींच्या नेमके विरोधी आहे. तसेच हे कृत्य तरुणांच्या ग्रुपने नियमावलीचे उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध करणारे आहे, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजित नांदगावकर यांनी कुरेशीचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदवले