गोळीबार करणार्‍यांना सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील लोणारी मंगल कार्यालयाच्या परिसरात पोलिसांना पाहून गोळीबार करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असणार्‍या पाच गुन्हेगारांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहर पोलीस स्थानकाचे पथक हे नियमित गस्त घालत असतांना त्यांना लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ काही जण संशयास्पद स्थितीत असल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यातील एकाने हवेत गोळीबार करून सर्वांनी तेथून पळ काढला. दरम्यान, गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून राजू बारे, भूषण यशवंत मोरे, विल्सन अलेक्झांडर जोसेफ (२७), सागर आनंदा पारधे (३०), ऑस्टीन शरद रामटेके (२१ ) यांना अटक केली. हे सर्व जण हुडको कॉलनीतील रहिवासी आहेत.

भुसावळ शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने ही कामगिरी केली. यात इकबाल अली इब्राहीम अली सैय्यद, भूषण चौधरी, समाधान पाटील व चंद्रशेखर गाडगीळ यांचा समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठोंबे यांनी घटना स्थळा भेट दिली. दरम्यान, थेट पोलिसांवरच गोळीबार करण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी निर्भयपणे गुन्हेगारांना गजाआड केल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

Protected Content