बर्ड फ्लूचा सोलापूर जिल्ह्यात शिरकाव

 

पंढरपूर, वृत्तसंस्था । राज्यातील बीड, परभणी, दापोली, दौंड, मुंबई आणि ठाणा जिल्हा पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातही बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावात काही दिवसांपूर्वी कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. कोंबड्यांच्या स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता आज याबद्दलचा अहवाल समोर आला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने जंगलगी गावातील परिसरापासून एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे. शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.

मंगळवेढा तालुक्यात कोंबड्यांची वाहतूक, विक्री, बाजार, जत्रा, प्रदर्शनाला प्रतिबंध घालण्यात आले आहे. जंगलगी, जंगलगी वस्ती, सलगर बुद्रुक, सलगर खुद्र, आसबेवाडी, लवंगी, बावची, चिक्कलगी, शिवणगी ही सर्व गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेश होईपर्यंत घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली. तसंच, जगलगी परिसरातील कोंबड्या विक्री, वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जंगलगीपासून पाच किलोमिटर परिसरातील जिवंत वा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य, अनुषंगिक साहित्य उपकरणे वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

Protected Content