वाशिंग्टन : वृत्तसंस्था । कोविड १९ विषाणू हा वटवाघळातून मानवात एका मध्यस्थ यजमान प्राण्याच्या मार्फत पसरला, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे जे पथक चीनला गेले होते त्याला चीनने पुरेशी माहिती मिळू दिली नाही हे खरे असले तरी जी माहिती थोड्याफार प्रमाणात हाती आली आहे त्यानुसार हा विषाणू मानव व वटवाघळे यांच्यातील मध्यस्थामार्फत पसरला असावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने काढलेला हा निष्कर्ष अजिबात धक्कादायक नाही, पण त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला हा मुद्दा सोडून सर्व निष्कर्षांवर आणखी संशोधनाची गरज जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने व्यक्त केली.
या अहवालात नंतर चीनच्या दबावाखाली बदलही करून घेतले जाऊ शकतात. मध्यस्थ प्राण्यामार्फत संक्रमण हा सगळ्यात पहिला टप्पा असून वटवाघळातून थेट मानवात प्रसार झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. शीत साखळी म्हणजे अन्नपदार्थातून या विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता नाही. कोरोना ज्या विषाणूमुळे होतो त्याच्या अगदी जवळ जाणारा विषाणू वटवाघळात सापडला असून हीच वटवाघळे विषाणूचे वहन करीत असतात. वटवाघळातील विषाणू व कोरोना विषाणू यांच्यातील कालिक अंतर हे काही दशकांचे असू शकते पण त्यातील दुवा ओळखता आलेला नाही, म्हणजे कुठल्या मध्यस्थ प्राण्यामार्फत वटवाघळातील विषाणू वेगळ्या स्वरूपात मानवात आलेला आहे हे समजलेले नाही.
जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ पीटर बेन एम्बारेक यांनी शुक्रवारी सांगितले, की अहवालास अंतिम रूप देण्यात आले असून त्यातील तथ्ये पुन्हा तपासून त्याचे भाषांतर केले जात आहे. येत्या काही दिवसात हा अहवाल पूर्ण जाहीर केला जाईल.
खवलेमांजरात आढळलेल्या विषाणूसारखेच हे विषाणू असून खवलेमांजर हा वेगळा सस्तन प्राणी आहे. मिन्क नावाचा एक केसाळ प्राणी व मांजर यांच्यातूनही या विषाणूला आश्रय मिळून नंतर तो माणसात आला असावा, असे अहवालात म्हटले आहे.
चीनमधील मांस व सागरी अन्न बाजारपेठ असलेल्या हनान येथून हा विषाणू पसरल्याचा संशय असला तरी हे विषाणू या बाजारपेठेत कुठून आले, नंतर कसे गेले याबाबत कुठलेही स्पष्टीकरण करता येत नाही, असे अहवालात म्हटले आहे. शीतपेटयांमुळे हे विषाणू जास्त अंतरापर्यंत पसरले असावेत असे सांगितले जात होते. पण अहवालात म्हटले आहे, की त्यामुळे एवढी मोठी साथ पसरली असेल असे मानता येणार नाही. हा विषाणू चीनमध्ये बाहेरून आलेल्या गोठवलेल्या पदार्थांतून आला असे गृहित धरले तरी २०१९ च्या सुरुवातीला विषाणूचा जास्त प्रसार नव्हता.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे, की ज्या पद्धतीने व प्रक्रियेने हा अहवाल तयार करण्यात आला तो पाहता हा अहवाल लिहिण्यात चीननेच मदत केल्याचे दिसते. चीनने हा आरोप फेटाळला असून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले, की अमेरिका या अहवालावर बोलत आहे, तसे करून अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ गटावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.