भीमा कोरेगाव हिंसाचार : नवलखा, तेलतुंबडे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचे अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून विविध कोर्टाच्या माध्यमातून अटकेपासून दोघे संरक्षण घेत होते. आता मात्र दोघांना कोर्टाने येत्या तीन आठवडयात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.

 

सर्वोच्च न्यायालयाने ६ मार्च रोजी नवलखा आणि तेलतुंबडे या दोघांना १६ मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश देत अंतरिम दिलासा दिला होता. परंतू आज न्या. अरुण मिश्रा आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने नवलखा आणि तेलतुंबडे यांना आत्मसमर्पण करण्यासाठी तीन आठवड्याचा वेळ दिला आहे. तसेच या दोघांनाही त्यांचे पासपोर्ट शक्य तितक्या लवकर पोलिसांकडे देण्याचे आदेश दिले आहेत. 1 जानेवारी, 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे आणि शेकडो इतर कार्यकर्त्यांविरुद्ध पुणे पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला होता. दोघांवर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. दरम्यान, महाराष्‍ट्र सरकारने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील एकूण 649 खटल्यापैकी 348 खटले मागे घेतल्याचा निर्णय घेतला आहे.

Protected Content