ब्रेकींग न्यूज : पोलीसांच्या वाहनावर झाड कोसळल्याने अधिकाऱ्यासह चालकाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एरंडोलकडून कासोदाकडे जात असताना अंजनी धरणाजवळ रस्त्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाचा गाडीवर अचानक झाड कोसळल्याने चालकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २९ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत इतर तीन कर्मचाऱ्यांना देखील दुखापत झाली आहे. सर्व जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल शहराजवळील कासोदा रस्तावरील अंजनी धरणाजवळील रस्त्यावर जळगाव येथील आर्थीक गुन्हे शाखेच्या वाहनावर अचानक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत वाहनातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी यांचा मृत्यू झाला असून चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे देखील जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. जखमी तिघाही पोलिसांना जळगाव येथे दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पोलीसांकडून माहिती देवून चर्चा करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी जायला निघाले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याचे समोर आले आहे.

Protected Content