Home Cities जळगाव नशिराबादच्या प्रभारी नगराध्यक्षपदी पंकज महाजन विराजमान ; पाच वर्षांचा संकल्प अखेर पूर्ण

नशिराबादच्या प्रभारी नगराध्यक्षपदी पंकज महाजन विराजमान ; पाच वर्षांचा संकल्प अखेर पूर्ण

0
11


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद नगरपरिषदेच्या राजकीय घडामोडींमध्ये बुधवारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली. लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील हे वैयक्तिक कारणास्तव ७५ दिवसांच्या रजेवर गेल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत पंकज महाजन यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. पदग्रहण सोहळ्यामुळे नशिराबाद नगरपरिषद परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी घेतलेला संकल्प पूर्ण करत पंकज महाजन यांनी नगरपरिषद आवारातच केस कापले.

पंकज महाजन यांच्या पदग्रहण सोहळ्यास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंकज महाजन यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंकज महाजन यांच्या प्रभारी नगराध्यक्षपदाच्या पदग्रहणाला त्यांच्या पाच वर्षांच्या संकल्पाची अनोखी किनार लाभली. सन २०२१ मध्ये नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळेपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून केस वाढवले होते. अखेर प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी नगरपरिषद आवारातच केस कापून आपला संकल्प पूर्ण केला. यावेळी त्यांच्या पत्नी लीना महाजन यांनी जाऊळ झेलले. संकल्पपूर्तीचा हा क्षण उपस्थितांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला. पंकज महाजन यांनी केस कापताच उपस्थित समर्थकांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले. पाच वर्षांपूर्वी घेतलेला संकल्प आणि त्यानंतर झालेली संकल्पपूर्ती यामुळे पदग्रहण सोहळ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.

प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर नगरपरिषदेच्या सर्व सभापती आणि नगरसेवकांनी पंकज महाजन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनीही त्यांची भेट घेत शुभेच्छा व्यक्त केल्या. पदग्रहणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकज महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आज मी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे. यापुढील माझे जीवन नशिराबादसाठी समर्पित असेल. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागला तरी चालेल; मात्र नामदार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वप्नातील नशिराबाद घडविण्याचा माझा निश्चितच प्रयत्न असेल,” असे त्यांनी सांगितले.

पदग्रहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंकज महाजन यांच्या समर्थकांकडून नशिराबाद नगरपरिषद परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे नगरपरिषद परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. पदग्रहण सोहळ्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी झाल्याने परिसरात राजकीय उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अनुपस्थितीत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पंकज महाजन यांच्यावर नगरपरिषदेच्या कामकाजाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे आगामी काळात नशिराबाद शहरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि नगरपरिषदेच्या कामकाजाला ते कशा पद्धतीने गती देतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound