खामगाव, प्रतिनिधी । कोरोना रुग्ण वाढत असल्याने खामगाव शहरातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असून आणखी तत्परतेने काम करावे. कोरोना रुग्णासाठी आणखी एक ऑक्सिजन बेडयुक्त आयसोलेशन वार्ड व आवश्यक सर्व सुविधा आवश्यक असून त्यासाठी ५ लक्ष निधी देवू अशी माहिती आमदार ऍड. आकाश फुंडकर यांनी दिली.
रुग्ण कल्याण समितीची बैठक आज २५ मार्च रोजी येथील सामान्य रुग्णालयात पार पडली. यावेळी आमदार फुंडकर यांनी आरोग्य विभागाचा कामाचा आढावा घेतला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सामान्य रुग्णालयात घाटाखालील सहा तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथील कोविड हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसतात. आणखी वाढीव ऑक्सिजन बेडचे कोविड कक्ष व विविध सुविधा आवश्यक आहेत, असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यावर लगेच ५ लाखांचा निधी देण्याचे सांगत तातडीने प्रस्ताव तयार करा असे आमदार आकाश फुंडकर सांगितले. यावेळी प्रसुती कक्ष निर्मिती, रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविणे यासह विविध विषयावर चर्चा झाली. कोरोना काळात रुग्ण सेवेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल समाजसेवक विपीन गांधी, आमदार आकाश फुंडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी शंकर वानखडे, मुख्याधिकारी अकोटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिनकर खिरोडकर, नायब तहसीलदार बी. एस. किटे, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता डी. पी. थेरोकार, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा यांची उपस्थिती होती.
रूग्णांची लुबाडणूक केल्यास कारवाई
सामान्य रुग्णालयात काही स्वयंघोषित समाजसेवक रुग्णाची दिशाभूल करून त्यांची लुबाडणूक करतात. तसेच रुग्णवाहिका मोफत असताना पैसे घेतले जातात, प्रसूती वॉर्डमध्ये सुद्धा पैसे मागितले जातात अश्या तक्रारी येत असल्याचा मुद्दा बैठकीत चर्चेत आला. त्यावर असे आढळून आल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.