कोविड केअर सेंटरला आग; दोघांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी । भांडूप येथील ड्रीम मॉलमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून काही जण होरपळले गेले असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

भांडूप येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवारी (दि. २६) रात्री १२ च्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस हे कोव्हिड रुग्णालय असून या रुग्णालयातील २ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वर रुग्णालयापर्यंत पोहोचली. या रुग्णालयात आग लागली तेव्हा ७६ रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली काढले. मात्र आग प्रचंड वाढली असून अजून ही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Protected Content