शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांना लेखी तक्रार

पाचोरा प्रतिनिधी । पिंप्री खु” प्र. पा. ता. पाचोरा येथील अनेक शेतकऱ्यांचे मक्याची कणसे आल्यानंतर अचानकपणे उभे मक्याचे पीक सुकू लागल्याने भरपूर प्रमाणात पाणी असूनही शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाणार असल्याने केवळ महिनाभराने काढणीवर आलेले मक्याचे उभे पीक सुकू लागल्याने शेतकऱ्यांना काय करावे असे सुचेनासे झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. 

पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथून जवळच असलेल्या पिंप्री खु” प्र. पा. येथील निंबा पुंडलिक पाटील व दत्तू तुकाराम पाटील हे शेतकरी वर्षानुवर्षे कापूस व मक्याचे पीक घेत असून यावर्षी ऑक्टोबर महिन्यात खरीप हंगामातील मक्याचे पीक काढल्यानंतर जमिनीची मशागत करून गावातीलच दर्शन कृषी सेवा केंद्रातून विक्रांत व ३३९६ जातीच्या वाणाची खरीप हंगामात मक्याची लागवड केली होती. या जातीच्या वाणाची उगवण शक्ती चांगली असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खते, ओषधी व मजुरी यासाठी हजारो रुपये खर्च केले. मक्याचे पीक डोक्याबरोबर वाढून महिनाभरापूर्वी कणसेही आले. शेतकरी वेळोवेळी मक्यास पाणी, फवारणी, खते देत असून अचानक गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण मक्याच्या पिकास आग लागल्या सारखे उभे तोटे सुकू लागले असल्याने यातील निंबा पुंडलिक पाटील यांचे एक हेक्टर १६ आर. वरील मका सुकल्याने सुमारे एक लाख रुपयांचे तर दत्तू तुकाराम पाटील यांचे एक हेकटर ३० आर क्षेत्रावरील मका सुकल्याने सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

याबाबत शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजू ढेपले, राज्य शासनाचे कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनी लवकरच शेतावर जाऊन पंचनामे करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रमेश भदाणे हेही उपस्थित होते. मक्याचे उभे पीक सुकल्याबाबत त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मक्यावर अशा प्रकारचा आजार मीही  प्रथमच पाहिला असून प्रत्यक्ष शेतावर गेल्यानंतरच परिस्थितीचे आकलन होईल, असे भदाणे यांनी सांगितले.

 

Protected Content