दिशा रवीची अटक , कोठडीवर ग्रेटा थनबर्गची टीका

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पर्यावरणवादी दिशा रवीला टूलकिट  गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आता पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गही दिशासाठी मैदानात उतरली आहे. ग्रेटाने  ट्विट करून दिशाचं समर्थन करतानाच मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून टीकाही केली आहे.

 

स्वीडनमध्ये राहणाऱ्या ग्रेटाने फ्रायडे फॉर फ्यूचर या संस्थेच्या एका ट्विटला रिप्लाय देताना मानवाधिकाराचा मुद्दा उचलला आहे. #StandWithDishaRavi असा हॅशटॅगही तिने वापरला आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ऑगस्ट  २०१८ मध्ये ग्रेटाने तिच्या संस्थेची स्थापना केली होती.

 

 

बोलण्याचं स्वातंत्र्य, शांततेत विरोध करणं आणि जनसभा आयोजित करणं मानवाधिकार आहे. या गोष्टी कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत गाभा असला पाहिजे, असं ग्रेटाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेलं वादग्रस्त टूलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी दिशाला १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथून अटक केलं आहे.. पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी हेच टूलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केले होते. भारतात द्वेष निर्माण करण्यासाठी दिशाने खलिस्तान समर्थक ग्रुप पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी हात मिळवणी केल्याचाही आरोप दिशा रवी यांच्यावर आहे. ही टूलकिट संपादित करणाऱ्यांपैकी दिशा एक असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे.

 

या प्रकरणात शंतनू मुळूक आणि निकिता जेकब यांचाही सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या संशयितांची चौकशी करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केलेली आहे.

Protected Content