जळगाव प्रतिनिधी । नवीनच घेतलेल्या मोबाईमध्ये वेबसाइट ओपन करून त्यात जन्म तारीख टाकली मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिले आणि वेळाने मोबाईलमध्ये पाहिल्याप्रमाणेच गळफास घेऊन तुकारामवाडीत मामाकडे राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बाथरूमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला.
हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय १३) रा शिंदखेडा ता. धुळे असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. हर्षल हा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. मामा दिपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. आज मामा दिपक कामानिमित्ताने घराबाहेर होते तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानवर गेली. दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळुन आला.तुकाराम वाडीतील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी मृतदेह तातडीने सुरुवातीला खाजगी रुग्णालयात यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल याच्याकडे मोबाइल होता. या मोबाईलमध्ये त्याने डेथ इन ऑकर-ई वेबसाइट ओपन करून याठिकाणी मृत्यू कधी होणार म्हणून स्वतःची जन्मतारीख टाकलेली असल्याचे दिसून आले. तसेच यानंतरही त्याने यू ट्यूबसह अनेक वेबसाइट ओपन केल्याचे दिसून आले. मोबाईलमध्ये वेबसाइट बघितल्यानंतर आजी काही वेळासाठी बाहेर जाताच हर्षलने मोबाइलमध्ये बघितल्याप्रमाणे बाथरूममध्ये जाऊन गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे.