चाळीसगाव प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सौ. आशाबाई रमेश चव्हाण यांच्या विरूध्द दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे. शहर विकास आघाडी, शिवसेना व अपक्षांनी एकत्रीतपणे भाजपचा डाव यातून हाणून पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
गत वर्षाच्या शेवटी अर्थात ३० डिसेंबर रोजी भाजपचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, आघाडीचे नगरसेवक आनंदा चिंधा कोळी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे पत्र दिले आहे. या ठरावावर चर्चा करण्यासाठी ४ जानेवारीला सकाळी ११ वाजता पालिकेची सभा बोलावण्यात आली होती.
उपनगराध्यक्षा आशा चव्हाण या शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश विक्रम चव्हाण यांच्या पत्नी असून अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. यामुळे आता त्यांच्यावर आणलेला अविश्वास प्रस्ताव पारीत होतो की बारगळतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या पार्श्वभूमिवर, आज सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यात उपनगराध्यक्षा आशा चव्हाण यांच्या मदतीला शहर विकास आघाडी, शिवसेनेचे दोघे सदस्य व अपक्ष धावून आले. यामुळे त्यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव बारगळणार असल्याचे स्पष्ट झाले. इतक्यात नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी प्रकृती खराब झाल्याचे कारण देत सभा दुपारी घेण्याचे सुचविले.
यानंतर दुपारी झालेल्या सभेत अविश्वास प्रस्ताव नाकारण्यात आला. यानंतर माजी आमदार राजीव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत नगरपालिकेतील सत्ताधार्यांवर टीका करत सभा स्थगित करण्याच्या प्रकारावर टीका केली.