येमेनच्या पंतप्रधानांसह मंत्र्यांचे विमान उतरताच स्फोट : २६ ठार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । येमेनच्या दक्षिणेला असणाऱ्या अदन विमानतळावर बुधवारी रात्री भीषण स्फोट झाला. पंतप्रधानांबरोबरच मंत्र्यांना घेऊन येणारं विमान उतरल्यानंतर काही वेळातच हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला

६० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये विमानातील काही सरकारी प्रतिनिधी मंडळातील व्यक्ती विमानाबाहेर येताना दिसत आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही अधिकारी जखमी झालेला नाही. स्फोटाचा आवाज ऐकून विमानाबाहेर आलेले काही अधिकारी पुन्हा आतमध्ये गेल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.

अदन विमानतळावर सौदी अरेबियामधून सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन येणारं विमान उतरलं. त्यानंतर हे अधिकारी विमानातून खाली उतरत असतानाच मोठा आवाज झाला आणि धुराचे सम्राज्य विमानतळाच्या आजूबाजूला पसरलं.

येमेन सरकारच्या मालकीच्या या विमानामध्ये प्रवास करणारे दूरसंचार मंत्री नजीब अल अवग यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचा आवाज ऐकून हा स्फोट ड्रोनच्या माध्यमातून घडवण्यात आल्यासारखे वाटले. येमेनचे पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद आणि अन्य बड्या नेत्यांसहीत अधिकाऱ्यांनी विमानतळावरुन शहरातील मशिक पॅसेल येथे हलवण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ सुरु झाल्याचे काही व्हायरल व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत आहे.

अदन आरोग्य विभागाचे उप प्रमुख मोहम्मद अल रोउबिद यांनी असोसिएट प्रेसला दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर तेथे किमान १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून ६० हून अधिकजण जखमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र नंतर हा मृत्यांचा आकडा वाढून २६ पर्यंत पोहचला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विमानतळावर बांधकामाला झालेली हानी, तुटलेल्या काचांचे खच दिसत आहे. काही व्हिडीओंमध्ये स्फोटात मरण पावलेल्यांचे मृतदेह दिसून येत आहे.

Protected Content