वाराणसीतून लोकसभा लढवतो , या समोर ! : खासदार धानोरकरांचे मोदींना आव्हान

 

नागपूर : वृत्तसंस्था । काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लढायला तयार आहे, असं वक्तव्य बाळू धानोरकर यांनी केलं आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत तयारीसाठी फक्त १५ दिवस मिळाले होते. आता तयारीला तीन वर्षे बाकी आहेत. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे, असं काँग्रेस खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा.

बाळू धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र अखेर बाळू धानोरकर यांचा ४५ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

तीन वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या भाजप नेत्याला एका आमदाराने पराभवाची धूळ चारल्याने धानोरकर जायंट किलर ठरले होते. त्यामुळे बाळू धानोरकरांना थेट पंतप्रधानांना आव्हान देण्याचा विश्वास वाटत आहे.

Protected Content