नवी दिल्ली: वृत्तसंस्था । शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिकच उग्र होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि कृषी राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. केंद्र सरकारला लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे
नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा जोरदार हल्लाबोल सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात प्रत्येक राजकीय पक्ष आपला झेंडा ठेवू इच्छित आहेत. यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. इतकेच नाही, तर अन्नदात्यांच्या हे आंदोलन सुरू असताना देशातील प्रसिद्ध व्यक्ती देखील या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे येत आहेत.
जर शेतकरी दोन पावले पुढे सरकले, तर सरकार देखील दोन पावले पुढे यायला तयार आहे. नाहीतर, या लोकांनी ६० वर्षे केवळ राजकारण केले होते आणि आज देखील हे शेतकऱ्यांचा वापर करून पुढे जाऊ पाहत आहेत, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी म्हटले. आम्ही शेतकरी आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या संपर्कात आहोत आणि मला वाटतं की लवकरच पुढील बैठक होईल, असेही ते पुढे म्हणाले.
पंजाबचे निलंबित पोलिस उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखविंदरसिंह यांनी अकाली सेवानिवृत्ती मागितली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी बंधुंसोबत मी असल्याचे सांगत लखविंदरसिंह जाखड यांनी गृह खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून कळवले आहे. तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी जंतर-मंतर येथे आयोजित आंदोलनात भाग घेतला. तेथे काँग्रेस पक्षाचे खासदार आंदोलन करत होते. माझे सहकारी येथे शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती करत आहेत, असे शशी थरूर म्हणाले.
आमचे कार्यकर्ते कृषी कायद्यांविरोधात उपवास करतील असे आम आदमी पक्षाने जाहीर केले आहे. ही माहिती दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी दिली.