गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची मागणी सोईच्या गटाकडे करावी; कृषी विभागाचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जिल्हयात कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांनी बीयाणे व खतांसाठी कृषी केंद्रावर गर्दी न करता आपल्या भागातील सोईच्या गटाकडे नोंदणीकरून मागणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कृषी सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशक खरेदी करतांना जास्त गर्दी होऊ शकते. तसेच सोशल डिस्टसिंग न पाळले गेल्यामुळे कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. कृषि केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी शेतकरी बांधवानी त्यांच्या भागात किंवा सोईच्या गटाकडे आपली नोंदणी करावी. त्यांनी आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणे, खते व किटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे प्रमुख हे कृषि सेवा केंद्रावर जाऊन एकत्रीत खरेदी करतील. यामुळे कृषि सेवा केंद्रावर खरेदीसाठी गर्दी होणार नाही. या प्रक्रीयेत कृषि विभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी समन्वयक म्हणून काम पाहतील.

शेतकरी बांधवांनी कृषी निविष्ठा खरेदीसाठी संबधीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून या पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी केले आहे.

Protected Content