कोलकाता : वृत्तसंस्था । बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर सर्व केंद्रीय यंत्रणा हाताशी असताना भाजपाला स्वत:च्या पक्षाध्यक्षांचे संरक्षण करता येत नाही याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे
ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा नियोजित असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. “तिथे एक छोटा अपघात झाला होता. हा ताफा ज्या रस्त्यावर येत होता त्या रस्त्यावरील एका चहाच्या टपरीजवळ ताफ्यातील ५० गाड्यांपैकी एका गाडीने कोणाला तरी धडक दिली किंवा त्या गाडीच्या दिशेने काहीतरी फेकण्यात आलं किंवा हे नियोजित होतं. पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. आम्ही तुमचे खोटे दावे सहन करणार नाही. आता हे अती होतं आहे,” अशा शब्दांमध्ये ममतांनी भाजपावर पलटवार केला.
गुरुवारी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा ममता बॅनर्जींचे समर्थक आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. डायमंड हार्बरला जाताना नड्डा यांच्या गाडीवर हल्ला झाला. हल्ला झाला तो परिसर तृणमूलचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे.
या हल्ल्यानंतर भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी तृणमूलवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. झे प्लस सुरक्षा असताना नक्की काय गोंधळ झाला याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आलेत.
“तुमच्याकडे सीआयएसएफ-बीएसएफचे एवढे कमांडो आहेत. तर त्यांनी तुमच्या गाडीला हात कसा लावला. तिथे तुमच्या सोबत असणाऱ्यांनी गोळीबार केला त्याचं काय?,” असे प्रश्न ममता यांनी उपस्थित केलं आहे. काल गोळी लागल्याने भाजपाच्या एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्यक्तीला ज्या बंदुकीमधून गोळी लागली तशा बंदुकी पोलीस खात्याकडून वापरल्या जात नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
“ते नवा हिंदू धर्म लागू करु पाहत आहेत. त्यांचा हिंदू धर्म आपला आमचा हिंदू धर्म नाही. ते जो धर्म लादू पाहत आहेत तो हिंदू धर्म नाही. त्याच्या या धर्माशी माझा तसेच तुमचाही काही संबंध नाही. अशाच पद्धतीने हिटलर मोठा झाला होता. चाउसेस्कू, मुसोलिनी सारखे हुकूमशाह मोठे झाले होते. आज नरेंद्र बाबू सरकार (हल्ल्याच्या) नाटकाचं नियोजन करते, नाटक करते आणि या नाटकाचे व्हिडीओ प्रसारमाध्यमांना पाठवते आणि विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांकडे त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद नाहीय. प्रसारमाध्यमे त्यांनी पाठवलेल्या नाटकांमध्ये स्वत:च्या नाटकांचा समावेश करुन ती दाखवतात,” अशा शब्दांमध्ये ममता यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
“रोज भाजपच्या कार्यक्रमांमध्ये हत्यारं दिसतात. ते स्वत:चं एकमेकांना मारतात आणि तृणमूल काँग्रेसला दोष देतात. तुम्ही केवळ या परिस्थितीचा विचार करा. ते बीएसएफ, सीआरपीएफ, लष्कर, सीआयएसएफ घेऊन फिरत आहेत तर त्यांना कसली भीती आहे?,” असा प्रश्न ममतांनी उपस्थित केला आहे.
नड्डा यांच्या ताफ्याला सुरक्षा पुरवण्यासंदर्भात आपल्याकडे कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती असं बंगाल सरकारने स्पष्ट केलं आहे. “तुम्ही राज्याला कळवत नाही. मात्र अडचण निर्माण झाल्यानंतर तुम्ही राज्याला दोष देता,” असा टोला यावरुन ममतांनी लगावला आहे.