मुंबई : वृत्तसंस्था । सर्वोच्च न्यायालयान राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली . यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अकरावीचे प्रवेश रखडले अखेर तोडगा काढण्यात आला असून एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे.
राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आणि सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात दिली. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी याबाबतचा निर्णय सरकार घेत नव्हते. यामुळे सर्व स्तरावरून टीका होत होती. यातच मंगळवारी उच्च न्यायालयातही याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने सरकारला बुधवारी आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते.
यानुसार राज्य सरकारने अखेर शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये ९ सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत त्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबरपूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरीता अर्ज केले असतील त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. हा निर्णय राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती उठविण्या करीता दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असेल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.