मुंबई : वृत्तसंस्था । टेलिव्हिजन क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने १२ आरोपींविरोधात १४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रामध्ये १४० जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून, दोन माफीचे साक्षीदार आहेत.
संपूर्ण आरोपपत्रामध्ये घोटाळा झाल्याचे सिद्ध करण्यासाठी तांत्रिक पुराव्यांवर भर देण्यात आला असून, आरोपी असलेल्या वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहार संबंधीच्या फॉरेंसिक ऑडिटचाही समावेश आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आले, तरी तपास याच गतीने सुरू राहणार असून वाहिन्यांच्या चालक, मालकांसह इतर काहींना वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
टीआरपी मोजण्यासाठी ग्राहकांच्या घरी बसविलेल्या बॅरोमिटर यंत्रांची डागडुजी, देखभालीसाठी बार्कने नेमणूक केलेल्या हंसा रिसर्च ग्रुप या कंपनीमार्फत तक्रार देण्यात आल्यानंतर ६ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे देऊन कृत्रिमरीत्या टीआरपी वाढविला जात असल्याचे उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सहायक पोलिस आयुक्त शशांक सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली सचिन वाझे, प्रकाश ओव्हाळ, नितीन लोंढे, रियाझुद्दीन काझी, बिपीन चव्हाण, कीर्ती माने या पोलिसांचे विशेष पथक तयार केले. गुन्हे शाखेतील इतर युनिटचे अधिकारी देखील त्यांच्या मदतीला देण्यात आले.
या पथकाने विशाल भंडारी, बोमपेल्लिराव मिस्त्री, शिरीष पतनशेट्टी, नारायण शर्मा, विनय त्रिपाठी, उमेश मिश्रा, रामजी वर्मा, दिनेशकुमार विश्वकर्मा, हरिष पाटील, अभिषेक कोलवडे, आशीष चौधरी आणि रिपब्लिकचा मुख्य वितरक घनःश्याम सिंग यांना अटक केली. यामध्ये काही वाहिन्यांचे मालक, हंसाचे माजी कर्मचारी तसेच जाहिरात एजन्सीचे प्रतिनिधी आहेत. तपासामध्ये रिपब्लिक, न्यूज नेशन, महामूव्ही, वॉव, फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या वाहिन्यांची नावे समोर आली.
मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने सुमारे ४७ दिवसांच्या अविरत तापसांनंतर मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. आरोपींचे मोबाइल, लॅपटॉप तसेच इतर माध्यमातून मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांचा यात समावेश आहे. ग्राहक, फॉरेंसिक तज्ज्ञ, जाहिरातदार, बार्कचे प्रतिनिधी, गुंतवणूकदार अशा सुमारे १४० जणांचे जबाब यामध्ये नोंदविण्यात आले आहेत. यात आरोपींची संख्या आणखी वाढणार असून पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
पैसे देऊन कृत्रिमरित्या टीआरपी वाढविण्याबरोबरच यासाठी ड्युअल एलसीएन तंत्रज्ञान वापर करण्यात आला पुरावा मिळाल्याचा दावा पोलिसांनी आरोपपत्रामध्ये केला आहे. देशातील विविध भागांतील केबल ऑपरेटर्सशी हातमिळवणी करून गैरमार्गाने दोन वेगवेगळ्या चॅनेल क्रमांकावर रिपब्लिक भारत हिंदी वृत्त वाहिनी आणि रिपब्लिक टीव्ही इंग्रजी वाहिनीचे या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रसारण करण्यात आले. टीआरपीसाठी आवश्यक असलेला ३० सेकंदाचा अवधीही चॅनल बदलताना कायम राहावा, अशीही प्रणाली बसविण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे.