सोलापूर- ”तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू” म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय? असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना प्रति-आव्हान दिले आहे. ईडी व सीडीवर फडणवीस यांनी केलेल्या भाष्यावर आता खडसे काय बोलणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे वजनदार नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतांना ”तुम्ही ईडी लावणार तर आम्ही सीडी लाऊ” अशी घोषणा करून एकच धमाल उडवून दिली होती. जळगाव जिल्ह्यातील सीडी प्रकरणाकडे खडसे यांनी या माध्यमातून थेट अंगुली-निर्देश केल्यामुळे या वाक्याची राजकीय वर्तुळात खूप चर्चा झाली होती.
दरम्यान, खडसे हे वाक्य बोलून अनेक दिवस उलटल्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ मंगळवारी भाजपचा मेळावा झाला. यात ”तुम्ही ईडी लावाल तर आम्ही तुमची सीडी दाखवू” या विधानाची आठवण करुन देताच फडणवीस म्हणाले, ”तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय ?” या माध्यमातून त्यांनी एकनाथराव खडसे यांना प्रति आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, इडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर रेड टाकली असेल तर त्यांच्याकडे निश्चित काहीतरी माहिती असेल. त्याशिवाय ते रेड टाकत नाही. मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. चूक झाली असेल तर एजन्सी कारवाई करेल.