मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने जनतेच्या दबावानेच मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला असून आपण सिद्धिविनायक मंदिरात ढोल-ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार असल्याची घोषणा भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
राम कदम यांनी ट्वीट करत म्हटलं की, उद्या सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. जल्लोष साजरा करणार.
दरम्यान, राज्यातील मंदिर खुली करावी यासाठी भाजपने विविध ठिकाणी आंदोलने केली होती. भाजपाने सिद्धिविनायक मंदिरातही आंदोलन केलं होतं. भाजपसस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर आंदोलन केलं होतं. प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेशही केला होता. मनसेनेही महाराष्ट्रातील मंदिरं लवकरात लवकर उघडा अशी मागणी केली होती. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं. तर आता भाजपनेही याचे श्रेय घेतल्याचे दिसून येत आहे.