टिकटॉक भारतात पुनरागमनाच्या तयारीत

नवी दिल्ली । पबजी मोबाईल भारतीय युजर्ससाठी पुन्हा सादर होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर आता टिकटॉक हे अ‍ॅपदेखील भारतात पुनरागमन करण्याची शक्यता बळावली आहे.

भारताने चीनला दणका देत अनेक अ‍ॅप्सवर बंदी लादली आहे. यात पबजी मोबाईल या गेमसह टिकटॉक या तुफान लोकप्रिय असणार्‍या शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपचाही समावेश होता. टिकटॉक हे भारतात नवीन स्वरूपात सादर होणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. याला आता कंपनीचे भारतातील प्रमुख निखील गांधी यांच्या एका पत्रामुळे बळ मिळाले आहे.

भारतात टिकटॉक संबंधी नव्याने वातावरण तयार होईल, आणि कोट्यवधी युझर्स याचा वापर करतील, असा विश्‍वास टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी कर्मचार्‍यांसाठी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, भारतातील नियमांचे पालन करण्याची टिकटॉकची तयारी असून युझर्सची माहिती आणि त्याच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेतली जाईल.

या आधीच आपण सरकारच्या दिशानिर्देशानुसार काम करण्यास तयार असल्याचे टिकटॉक इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले होते. आपले अ‍ॅप भारतात पुन्हा कार्यान्वित होईल, असे टिकटॉकला वाटत असले, तरी एकंदरीत परिस्थिती पाहता त्याची शक्यता फारच दुर्मीळ आहे.

Protected Content