पुणे विभागातून एका दिवसात ७५ मालवाहू गाड्या रवाना

पुणे वृत्तसंस्था । मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून एका दिवसात ७५ मालवाहू गाड्या रवाना झाल्याचा अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. सध्या प्रवासी वाहतूक मर्यादित असल्याने रेल्वेने मालवाहतुकीवर लक्ष केंद्रित केले असून, पुण्यातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय रेल्वेने २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचा संकल्प केला आहे. यांतर्गत मध्य रेल्वेकडून वाहन क्षेत्रातील कंपन्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. देशभरातील विविध शहरांतील कारखान्यांतून थेट विक्रेत्यांपर्यंत वाहने पोहचवण्यासाठी मध्य रेल्वेने वाहन वाहतूक सुरू केली आहे. नुकत्याच पिंपरी-चिंचवड स्थानकावरून ७५ पिकअप व्हॅन बांग्लादेशातील बेनापोलसाठी रवाना झाल्या. साखरेच्या वाहतुकीवरदेखील लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने

रेल्वे प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. त्यामुळेच एका दिवसात ७५ गाड्यांची वाहतूक करणे शक्य झाले आहे. पुणे विभागालगत मुंबई, सोलापूर विभाग आणि साउथ वेस्ट रेल्वेची हद्द आहे. या तीन ठिकाणांहून येणाऱ्या गाड्यांना पुणे विभागातून सुखरूप रवाना करण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. रूळांची देखभाल दुरुस्ती, सिग्नल व्यवस्था, आदी कामे प्राधान्याने करावी लागतात. ७५ गाड्या रवाना करण्याची व्यवस्था चोख पार पडल्याचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले. दोन सप्टेंबरला ७० गाड्या रवाना झाल्या होत्या. सध्या प्रवासी गाड्या कमी असल्याने मालगाड्यांना तुलनेने अधिक वेगाने रवाना करणे शक्य असल्याचे झंवर यांनी सांगितले.

Protected Content