जळगाव प्रतिनिधी | संस्थेच्या कामातील अनियमीतता व पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी ‘या’ सहकारी पतपेढीतील संचालकांना अपात्र केले आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगाव नागरी सहकारी पतपेढीच्या संचालकांनी संस्थेच्या कामकाजात अनियमितता, पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना पदावरून अनर्ह ठरवण्यात यावे, असा तक्रार अर्ज विकास उखर्डू नारखेडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केला होता. त्या अनुषंगाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात सुनावणी झाली.
या सुनावणीमध्ये कोणताही ठोस खुलासा, पुरावा सादर न केल्याने सात विद्यमान संचालकांना जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पदावर राहण्यास अपात्र ठरवले आहे. यामध्ये कुसुम प्रभाकर पाटील, खुशाल तापीराम बोरोले, दिलीप चिंतामण चौधरी, सिद्धार्थ बापू तायडे, सविता अनिल भोळे, मालती गजानन भंगाळे व सुधाकर विश्वनाथ ढाके यांचा समावेश आहे.
दरम्यान, पतपेढीची कलम ८८ अन्वये चौकशी करण्यात आली. प्राधिकृत अधिकार्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार तत्कालीन व विद्यमान संचालकांवर २ कोटी १७ लाख १० हजार ७६७ एवढ्या रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. या अनुषंगाने अधिनियम कलम ९८ प्रमाणे वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले होते. विद्यमान सात संचालकांनी कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. वरिष्ठ कार्यालयाकडे अपील दाखल केल्याचे नमूद केले आहे. ते पदावर राहण्यास अपात्र असल्याची खात्री झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी त्या सात संचालकांना अपात्र ठरवले आहे.