शासनाकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोयी सुविधांसाठी ७ कोटींचा निधी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्ती तसेच विस्तारीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण या माध्यमातून सात कोटी रुपयांचा निधी पुनर्नियोजनाने उपलब्ध करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्वास्थ संजीवनी नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटणार आहे. त्यासोबतच या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सर्व कामांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या मान्यतेने प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला ठिकठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविण्यात येतात. आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व्हावे व या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यातयासाठी जिल्ह्यातील ४६ आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या निधीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती तसेच फर्निचर सह रंग काम व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळाव्यात त्यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व्हावे व अत्याधुनिकरण होऊन आरोग्याच्या प्राथमिक सोयीसुविधा एकाच छताखाली दर्जेदार पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आग्रही होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर यांनी जळगाव जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीचा तसेच अत्याधुनिकरणाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे ठेवल्यानंतर जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेल्या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार व खासदार यांनी तात्काळ या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सात कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये दुरुस्ती, रंगकाम, फर्निचर, व इतर सुशोभीकरणाची कामे व अत्याधुनिकरण होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरविताना स्वभावतालचे वातावरण प्रसन्न असणे गरजेचे असते या उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून ग्रामीण भागातील जनतेला प्रसन्न व अल्हाददायक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. जिल्ह्यात प्रथमच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सुशोभीकरणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे एकाच वेळी जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांचे रूप पालटणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सात कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला स्वास्थ संजीवनी कार्यक्रम खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना संजीवनी देणारा ठरणार आहे.

Protected Content