जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल अँप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. जळगाव जिल्ह्यात 16 मार्च पासून आज पर्यंत 66 तक्रारी प्राप्त झाल्या. त्या सर्व तक्रारीचे जिल्हा निवडणूक विभागाकडून निवारण करण्यात आले.
कोणताही नागरिक निवडणूकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या अँपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. त्यामुळे हे अँप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरणार आहे.
अमळनेर तालुक्यात एक तक्रार प्राप्त झाली. त्या तक्रारीची सत्यता पडताळून ती वगळण्यात आली. भुसावळ तालुक्यातुन तेरा तक्रारी आल्या होत्या त्या तेरा तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली व एकही तक्रार प्रलंबित नाही. चाळीसगाव तालुक्यातून आठ तक्रार प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी सत्यता पडताळून चार वगळण्यात आल्या चार तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. चोपडा तालुक्यात चार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी दोन तक्रारीची सत्यता पडताळून वगळण्यात आल्या तर दोन तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. एरंडोल तालुक्यातून एकही तक्रार प्राप्त नाही.
जळगाव शहर येथे एकोणीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी अठरा तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे तर एक तक्रार सत्यता पडताळून वगळण्यात आली. जळगाव ग्रामीण येथे चार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याची सत्यता पडताळून एक वगळण्यात आली तर तीन तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. जामनेर येथे सात तक्रार प्राप्त झाल्या होत्या. सातही तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. मुक्ताईनगर येथे एकही तक्रार प्राप्त झाली नाही. पाचोरा येथे पाच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याची सत्यता पडताळून दोन तक्रारी वगळण्यात आल्या तर तीन तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे. रावेर येथे एक तक्रार प्राप्त झाली. त्याची सत्यता पडताळून ती वगळण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात एकूण 66 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी सत्यता पडताळून 12 तक्रारी वगळण्यात आल्या तर 54 तक्रारीवर विहित काळात कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील अँपवर अपलोड करावा असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे, ती तक्रार प्राप्त होताच विहित कालावधीत त्यावर कार्यवाही होते.