जळगाव/चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकेची रक्कम खासगी कंपनीच्या माध्यमातून एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी दिलेली असताना कंपनीच्या तीन जणांनी रोख रकमेचा अपहार करून एटीएममध्ये रक्कम पूर्ण न भरता वेळोवेळी रक्कम काढून तब्बल ६४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील आणि इतर तालुक्यात असलेले एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी बँकेने एका खासगी कंपनीला दिली आहे. याच विश्वासाने बँकेने वेळोवेळी कंपनीचे नोकर असल्याने एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करण्यासाठी दिलेले असताना संशयित आरोपी प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्य नगर, चाळीसगाव या दोघांनी दिलेली रक्कम एटीएममध्ये पूर्ण न भरता त्यातून वेळोवेळी थोडी थोडी अशी एकूण ६४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा अपहार केला आणि कंपनीचा विश्वासघात केला. शिवाय एवढेच नाही तर ऑडिटर चंद्रशेखर गुरव यांनी ऑडिट दरम्यान हा प्रकार कंपनीच्या निदर्शनास आणून न देता खोटे ऑडिट अहवाल सादर करून अपहर करणाऱ्या दोघांना मदत केली आणि कंपनीचे फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे कर्मचारी गोरक्षनाथ पोपट डोंगरे (वय-३८) रा. नाशिक यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता संशयित आरोपी प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्य नगर, चाळीसगाव आणि त्यांना मदत करणारा ऑडिटर चंद्रशेखर एकनाथ गुरव रा. गुजरात पेट्रोल पंपाजवळ, निवृत्ती नगर, जळगाव अशा तिघां विरोधात कंपनीचा अपहर केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेचा पूर्ण तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.