निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावरील जीवघेणा हल्लाप्रकरणात ६ संशयितांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरसोद फाट्याजवळ डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन जणांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फरारपैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी सहा जणांना न्यायमुर्ती श्रीमती एम.एम.बढे यांनी सोमवार १२ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे तरसोद फाट्याजवळ मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाळूचे डंपरवर कारवाई करण्यासाठी गेले असतांना अचानक त्यांच्यावर वाळूमाफियांकडून जीवघेणा हल्ला चढविण्यात आला. या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर मारेकरी फरार झाले होते. यातील गौतम यशवंत पानपाटील वय ३८ रा. सावखेडा ता.जि.जळगाव आणि विठ्ठल भगवान पाटील वय-३६ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव यांना अटक जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता पोलीसांनी कारवाई करत पवन उर्फ प्रसाद कैलास कोळी वय २३ रा. साकेगाव, प्रविण सुकलाल चौधरी वय २५, निखिल गोपाल कच्छवा वय २० दोन्ही रा. पिंप्राळा ता.जि.जळगाव, मंगेश यशवंत पानपाटील वय २५ रा. सावखेडा, जगदीश प्रमोद तायडे वय १९ रा. साकेगाव आणि अजय मुलचंद चौधरी वय २८ रा. पिंप्राळा यांना अटक केली.

अटकेतील सहाही जणांना गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती श्रीमती एम. एम.बढे यांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित ८ जण अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Protected Content