शेअर मार्केटच्या नावाखाली ६ लाखांची फसवणूक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जय नगरात राहणारे ५६ वर्षीय व्यापारी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सुमार ५ लाख ९५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शनिवारी २७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जय नगरातील ओंकारेश्वर मंदीराजवळ हेमेंद्र राजेंद्र शर्मा वय ५६ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करता. राम इनव्हेस्टमेंट नावाच्या व्हॉटसॲप गृपच्या माध्यमातून गृप ॲडमीन गुरूराम या नावाच्या व्यक्तीने हेमेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शर्मा यांचा विश्वास संपादन करून त्यांनी टेकस्टार कंपनीचे शेअर खरेदी करण्यास सांगितले. त्यासाठी गुरूराम नामक व्यक्तीने त्यांनी टेकस्टार हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०२४ ते ४ एप्रिल २०२४ दरम्यान त्यांच्या खात्यातून एकुण ५ लाख ९५ हजार रूपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर त्यांना मुद्दल आणि नफा परत मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी २७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार गुरूराम नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Protected Content