सख्ख्या भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात दारू पिण्याच्या वादातून लाकडी दांडक्याने मारून सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा शुक्रवारी २३ जून रोजी दुपारी २ वाजता अतिरिक्त सत्र न्यायाधिश जे.जे. माहिते यांनी सुनावली आहे. जय प्रल्हाद मरसाळे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात प्रल्हाद तानु मरसाळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचा मुलगा दिपक मरसाळे आणि जय मरसाळे यांच्यात नेहमी दारू पिण्यावरून वाद होत होते. १८ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दारू पिण्याच्या कारणावरून जय आणि दिपक यांच्यात वाद झाला. यात रागाच्या भरात जय याने दिपकच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून खून केला तर वडील प्रल्हाद मरसाळे यांना देखील दुखापत केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जय मरसाळे याला अटक करण्यात आली होती. हा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधिश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात सरकारपक्षातर्फे एकुण ८ साक्षिदार तपासण्यात आले. यात वडील प्रल्हाद मरसाळे, बहिण व भाचा यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्या. मोहिते यांनी जय मरसाळे याला दोषी ठरवत भावाचा खून व वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दंडांची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. वैशाली महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार संजय गोसावी आणि केसवॉच इकबाल पिंजारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content