…तर आयुक्तांच्या कार्यालयास कुलूप ठोकणार : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इशारा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचा मुद्दा पावसामुळे पुन्हा ऐरणीवर आला असतांनाच आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या प्रकरणी शहरातील शेरा चौकात आंदोलन करत आयुक्तांच्या कार्यालयात कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा हा नवीन विषय नसला तरी आता पावसामुळे आधीच खराब असलेल्या रस्त्यांची अतिशय दैनावस्था झाली आहे. विविध भागांमधील नागरिक यामुळे हैराण झालेले आहेत. पावसामुळे रस्ते अतिशय खराब असल्याने वाहनांवरून तर सोडाच, पण पायी चालणे देखील जिकरीचे झालेले आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने याच्याच विरोधात आंदोलन करून नगरसेवकांसह महापालिका प्रशासनावर थेट आरोप करत इशारा देखील दिला आहे.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे मेहरूणमधील शेरा चौकाच्या परिसरात महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यात महापालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या विरूध्द घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाच्या नंतर लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत बोलतांना राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी यांनी प्रशासनासह नगरसेवकांवर गंभीर आरोप केले.

या संदर्भात अशोक लाडवंजारी म्हणाले की, या भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे. या भागातील नगरसेवकांनी ठेकेदारांकडून १० टक्के कमिशन घेतले असून यामुळे कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. महापालिकेने लवकरात लवकर येथील तसेच शहरातील रस्त्यांची डागडुजी करावी, अन्यथा आम्ही महापालिका आयुक्तांच्या कार्यालयास कुलूप ठोकून त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न करणार असल्याचा इशारा लाडवंजारी यांनी दिला.

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी, शहर उपाध्यक्ष साहिल पटेल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

खालील व्हिडीओत पहा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आंदोलन.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/830021238373738

Protected Content