धाबे येथील प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप

nirop

अमळनेर (प्रतिनिधी)। पारोळा तालुक्यातील धाबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक तथा पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांच्या संकल्पनेतुन नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १ लीतील विदयार्थ्यांना शाळा प्रवेश व इयत्ता ४ थीच्या विदयार्थ्यांना निरोप देण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला.

मार्च महिन्यातच इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थी शोधुन आज त्यांचे स्वागत करून त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. तसेच गेल्या सहा वर्षापासुन इयत्ता ४ थीच्या विदयार्थ्याना आगळ्या वेगळया पद्धतीने निरोप दिला जातो. गेल्या सहा वर्षापूर्वी जेव्हा मुख्याध्यापक साळुंखे धाबे शाळेवर हजर झाले त्यावेळी जुलै महिन्यात बरेच मुले त्यांना घरीच फिरतांना दिसायचे. त्यांची चौकशी केल्यावर शाळेत का गेले नाहीत? तर बसला पैसे नाहीत,पास नाही, गणवेश नाही, वहया पेन दप्तर नाही अशा विविध अडचणी त्या मुलांनी सांगितल्या. सर्वच विदयार्थी गरीब आदिवासी भिल्ल बांधवांची असल्याने शिक्षणासाठी आर्थिक अडचण आहेच. मग यावर तोडगा म्हणुन त्यांनी विदयार्थ्यांना जाण्या येण्यासाठी सोयीची व त्यांच्या गरजा पुर्ण करू शकेल अशी पारोळा शहरातील गजानन हायस्कुलचे मुख्याध्यापक गणेश जाधव व उपशिक्षक व्ही बी पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही आनंदाने मुलांना शाळेत प्रवेश देवुन त्यांच्या सर्वच गरजा पुर्ण करण्याचा विडा उचलला.

गेल्या सहा वर्षांपासून आगळावेगळा उपक्रम
गेल्या सहा वर्षापासुन या विदयार्थ्यांना धाबे शाळा पाटी, पेन्सिल, दुरेघी चाररेघी व खात्यांच्या वहया, चित्रकला वही, रंगपेटी, कंपास पेटी, पेन, दप्तर, बुट, सॅण्डल, स्वेटर व उन्हाची टोपी पुरवितात व गजानन हायस्कुल त्यांना शाळेचे गणवेश, वर्षभराच्या वहया पेन व वर्षभर मोफत पास उपलब्ध करून देतात. त्यामुळे आज शंभर पेक्षाही जास्त शाळाबाह्य राहणारे विदयार्थी नियमित शाळेत़ जावु लागले आहेत. विदयार्थी एक दोन दिवस घरी राहीला तरी गजाननचे मुख्याध्यापक व शिक्षक नियमित चारचाकी गाडी गावात आणुन त्यांना शाळेत घेवुन जातात. उपस्थिती टिकवुन ठेवण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवुन नियमित पाठपुरावा केला जातो. त्याच प्रकारे आज विदयार्थ्यांना निरोप देण्यात आला. उपस्थित शाळेच्या सर्वच विदयार्थ्यांना बिस्किटपुडे व सोनपापडी वाटप करुन स्नेहभोजन देण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी गजानन हायस्कुलचे मुख्याध्यापक गणेश जाधव, व्ही बी पाटील, एस आर पाटील,तांबोळे शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र नांद्रेकर, उत्रड शाळेचे मुख्याध्यापक भुषण पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानले. गुणवंत पाटील यांनी सुत्रसंचलन केले. वीर बजरंग ग्रुपचे अध्यक्ष रविंद्र भिल यांचे सहकार्य लाभले.

Add Comment

Protected Content