खड्डयामुळे घसरली स्कूटी आणि झाला घात : एकुलत्या कन्येचा अपघाती मृत्यू !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तोरणमाळ येथून येतांना खड्डयांमुळे स्कूटी घसरून पडल्याने यावरील तरूणीला कंटेनरने चिरडल्याची करूण घटना आज घडली असून यात कुटुंबातील एकुलत्या एक कन्येचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अमळनेर तालुक्यातील,वावडे येथील रवींद्र साहेबराव पाटील यांची एकुलती एक मुलगी हर्षदा रवींद्र ठाकरे (पाटील ) ही १९ वर्षांची युवती आज आपल्या कुटुंबासमवेत तोरणमाळ येथून घरी परत येत होती. शहादा तालुक्यातील अनरद बारी जवळ रस्त्यावर असलेल्या खड्डयामुळे स्कूटी क्रमांक(एमएच १८ बीडब्ल्यू ०२७४) हीच्यावरून तिचा तोल गेल्याने ती खाली पडली. खाली पडताच मागून येणार्‍या एमएच३४ बीजी ५८८५ या कंटेनरने तिला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पाटील कुटुंबाच्या समोरच त्यांच्या कन्येचा मृत्यू झाल्याने त्यांनी अपघातस्थळी प्रचंड आक्रोश केला.

मयत हर्षदा ही शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी विद्यालयाला दुसर्‍या वर्षाला शिकत होती. ती शाळेत देखील अत्यंत हुशार व प्रेमळ मनमिळावू स्वभावाची होती.तिच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली आहे.हर्षदा ही सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील आहे.अपघाताचे वृत्त कळताच वावडे गावात शोककळा पसरली आहे. खराब रस्त्यावरील खड्डयाने या तरूणीचा बळी घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.

Protected Content