नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने जिल्ह्यातील एकूण मतदारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. यात मतदारांत चार लाख ८७ हजारांनी वाढ झाली असून, जिल्ह्यातील एकूण मतदारांचा आकडा थेट ४७ लाख ४८ हजार १५३ पर्यंत पोहोचला.
नवमतदारांच्या नोंदणीत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा व उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी मंगळवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक, तर त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघात सर्वांत कमी मतदार आहेत. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या मतदारांत चार लाख ८७ हजारांनी वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये सैन्य दलातील एकूण नऊ हजार ४० मतदार आहेत. अनिवासी भारतीय असलेले ५६ मतदार आहेत. तृतीयपंथी ११४ मतदार असून, दिव्यांग मतदारांची संख्या १९ हजार २८७ इतकी झाली आहे.
मतदार संख्येवरून स्त्री-पुरुषांचे लिंग गुणोत्तर निश्चित केले जाते. जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर ९१९ असून, सर्वाधिक गुणोत्तर ९६५ इतके कळवण विधानसभा मतदारसंघात आहे. सर्वांत कमी गुणोत्तर नाशिक पश्चिम (८५८) या मतदारसंघात आहे.
मतदारांची संख्या झपाट्याने वाढत असताना मतदान केंद्रेही वाढली आहेत. जिल्ह्यात एकूण चार हजार ७३९ मतदान केंद्रे आहेत. नाशिक पश्चिममध्ये (३७९) सर्वाधिक मतदान केंद्रे असून, सर्वांत कमी देवळाली (२६८) मतदारसंघात मतदान केंद्रे आहेत. मतदारांच्या अंतिम यादीत एकसारखी छायाचित्रे असलेले एकूण ४९ हजार ३८ मतदारांची तपासणी करून १७ हजार २७२ मतदारांची वगळणी केली आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे असलेली १४ हजार ८०९ नावे तपासून तीन हजार ४३९ नावे वगळली आहेत.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत मतदार नोंदणी व दुरुस्ती करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली.नवमतदारांमध्ये ४६ हजार ६६४ युवकांचा समावेश असून, जिल्ह्यातील महाविद्यालयांचा यात मोलाचा सहभाग राहिला. विशेष म्हणजे १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या ३२ हजार ३३३ युवकांकडून आगाऊ अर्ज स्वीकारले आहेत.यातील ९९ टक्के युवकांनी ऑनलाइन नोंदणी केली; तर केवळ एक टक्का मतदार नोंदणी ऑफलाइन झाली आहे.
मतदारसंघनिहाय मतदार
नांदगाव- ३,२७,०२२
मालेगाव(मध्य)- २,९६,००२
मालेगाव (बाह्य)- ३,५३,६७०
बागलाण- २,८४,३३१
कळवण- २,९१,९७९
चांदवड- २,९५,२९९
येवला- ३,०९,९७६
सिन्नर- ३,०३,९३४
निफाड- २,८७,९१९
दिंडोरी- ३,१८,६७८
नाशिक (पूर्व)- ३,७८,२८९
नाशिक (मध्य)- ३,२१,६४४
नाशिक (पश्चिम)- ४,३८,१६७
देवळाली- २,७१,३५६
इगतपुरी- २,६९,८८७
एकूण- ४७ लाख ४८ हजार १५३