टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळ रनर्सच्या ३७ धावपटूंचा सहभाग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ ही स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली. यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ३७ धावपटूंनी देखील यशस्वी सहभाग नोंदविला व आपल्या असोसिएशनचे व भुसावळ शहराचे नाव अभिमानाने उंचावले.

४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन, २१ किमीची अर्ध मॅरेथॉन, महिलांकरिता १० किमीचा रन व ६ किमीचा ड्रीम रन या ४ श्रेणींमध्ये हि स्पर्धा घेण्यात आली. अर्ध मॅरेथॉन वगळता इतर तीनही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकासमोरून सुरु झाल्या. तर अर्ध मॅरेथॉन माहीमच्या रेती बंदर मैदानातून ठीक ५ वाजता सुरु झाली. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्यपाल,मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष,राज्याचे विविध खात्यांचे मंत्री व पोलीस,प्रशासन व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

या धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी ध्वनीक्षेपकावर गाणीही वाजविण्यात आली. तसेच मुंबई पोलीस बॅण्डनेही सादरीकरण केले. त्याशिवाय असंख्य मुंबईकर भल्या पहाटेपासून धावपटूंसाठी केळी,पेयजल, विविध फळे,चॉकलेट्स आदी खाद्यपदार्थांची व्यवस्था करून टाळ्या वाजवून व विविध प्रकारचे फलक हातात घेऊन धावपटूंचे कौतुक करीत होते. या असंख्य मुंबईकरांच्या प्रेमामुळेच कि काय प्रत्येक धावपटू आपले नैतिक कर्तव्य समजून अविरत धावत होता व आपले लक्ष्य गाठत होता. ‘ड्रीम रन’ या गटात विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक संस्था व नागरिकांनी सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेत आणि वैशिष्टय़पूर्ण वेशभूषा परिधान करीत सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.मुंबई मॅरेथॉनचे यंदा १९वे वर्ष होते.
या रनचे वैशिष्ठ्य म्हणजे कित्येक महिला धावपटू चक्क हातमागावर विणलेल्या साडय़ा नेसून धावल्या. त्याशिवाय भारत माता कि जय , वंदे मातरम, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया , जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देत कित्तेक धावपटू एकत्र धावत होते व इतरांना प्रेरित करीत होते. हा संपूर्ण उत्साह विदेशी धावपटू मोठ्या कुतूहलाने बघत धावत होते. या अतिशय रोमांचक वातावरणात पहाटेचा काळोख भेदत व थंडीला हुलकावणी देत भुसावळचे धावपटू देखील आपल्या तिरंगी रंगाच्या अधिकृत टी शर्ट परिधान करून धावत असतांना मूळचे जळगाव जिल्यातील व आता मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले नागरिक व सोबतचे धावपटू भुसावळच्या धावपटूंची आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते व लहान शहरातून इतके धावपटू आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत होते.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सहभागी धावपटू:

४२ किमी (१४ धावपटू) : उमेश घुले, विजय फिरके, तरुण बीरिया, मोहन देशपांडे, युवराज सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी,विलास पाटील,संतोष मोटवानी,सुरेश सहानी,प्रदीप सोळंकी, संदीपकुमार वर्मा, प्रविण वारके, गणसिंग पाटील, डॉ तुषार पाटील.

२१ किमी (१५ धावपटू): डॉ चारुलता पाटील, डॉ स्वाती फालक, डॉ वर्षा वाडिले, एकता भगत, दीपा स्वामि, माया पवार, प्रियंका मंत्री, महेंद्र पाटील, राजेंद्र घाटे, रमेशसिंग पाटील, सारंग चौधरी, सुधाकर सनान्से, प्रकाश आटवानी, सचिन मानवानी, जय मनवानी,प्रविण पाटील

१० किमी (२ धावपटू) : माधुरी चौधरी, किर्ती मोताळकर

६ किमी (५ धावपटू): पूनम भंगाळे, वैशाली मानकरे, नितीन पाटील,संजय मोताळकर, भालचंद्र मानकरे
याशिवाय प्रविण फालक, राजेंद्र ठाकूर (४२ किमी), डॉ नीलिमा नेहेते, ममता ठाकूर (२१ किमी) व मंजू शुक्ला (६ किमी) हे धावपटू आपल्या व्यक्तिगत अडचणींमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही.

Protected Content