मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । एकीकडे लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मुंबईकरांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना, दुसरीकडे जुहू परिसरातील सुमारे ३५ हजार नागरिकांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या तीव्र नाराजीची दखल घेण्यासाठी मतदानावर बहिष्काराचा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
जुहू परिसरातील जवळपास २०० इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हा निर्णय एकत्रितपणे घेतला असून प्रत्येक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बहिष्कारासंदर्भातील बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमुळे संपूर्ण परिसरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे.

या परिसरात मिलिटरी रडार असल्यामुळे त्याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून येथील २०० इमारती तसेच दोन झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. इमारती धोकादायक अवस्थेत असतानाही कायदेशीर अडचणींमुळे पुनर्विकास होऊ शकत नसल्याने सुमारे ३५ हजार नागरिक जीव मुठीत धरून राहात असल्याचे चित्र आहे.
या भागातील रहिवाशांनी आणि झोपडपट्टीवासीयांनी वेळोवेळी आपल्या समस्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून केवळ आश्वासनांचीच खैरात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
बॅनरमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या संतापात SR0150 कायदा कालबाह्य असून तो लागू ठेवल्यामुळे कायदेशीर घरे उद्ध्वस्त होत असल्याचा उल्लेख आहे. १९३९ च्या ब्रिटिशकालीन कायद्याअंतर्गत, जो १९७६ मध्ये अंमलात आणण्यात आला, नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे २०० इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात असून ३५ हजार नागरिकांवर अन्याय होत असल्याचे या बॅनरमधून ठळकपणे मांडण्यात आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी अनेक नेत्यांनी निवडणुकीनंतर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर कोणीही फिरकले नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी आता पालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात लागलेल्या बॅनरनंतर प्रभाग क्रमांक ६८ मधील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी रहिवाशांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंची भेट घालून देत या प्रश्नाचा गांभीर्याने पाठपुरावा करू आणि योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.



