जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील 35 किमी लांबीच्या दोन मोठे रस्ते दर्जोन्नत होण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणुन घोषित केले आहे. या सर्व रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकास होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
या दर्जोन्न्त रस्त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार कायापालट
जळगाव तालुक्यातील सुजदे ते सुजदे फाटा, सुजदे फाटा ते आव्हाने रस्ता (ग्रा.मा. 46, 88 व 56) लांबी 20.500 किमी तसेच जळगांव-मेहरूण-पांजरपोळ- कुसुंबा-चिंचोली-धानवड-करमाड रस्ता लांबी 14 किमी अशा एकूण 35 किमी लांबीच्या रस्त्यांना दर्जोन्नती आज प्राप्त झाली आहे. जळगाव तालुक्यातील दुर्लक्षित असलेल्या 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना दर्जोन्नती मिळाल्यामुळे या रस्त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकास होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
या रस्त्यांवरील गावांची संख्या, लोकसंख्या व रस्त्यांवर होणारा वापर तसेच जिल्हा परिषदेचा ठराव विचारात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन मोठ्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यास मंजुरी दिली आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेऊन सदर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता जिल्हा परिषदेकडील 35 किमी लांबीचे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होणार आहे. दरम्यान, या रस्त्यांच्या दर्जोन्नतसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 चे सुभाष राऊत, अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, जि. प. चे कार्यकारी अभियंता येवले यांनी प्रस्ताव तयार करून मंत्रालयात सादर केला होता.
जामनेर तालुक्यातील 30 किमीचे शेती रस्ते झाले ग्रामीण मार्ग
जामनेर तालुक्यातील 30 किमीचे योजनाबाह्य (शेती रस्ते) रस्ते हे ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-2021 मध्ये समाविष्ट करण्यास मंजुरी मिळाली आहे. यात पळासखेडे विटनेर (हिवरखेडा) रस्ता, वाकोद ते पळासखेडा (मोगलाईचे) रस्ता, ग्रा.मा. 92 ते प्रजिमा 18 रस्ता, अंबिलहोळ देवीचे ते गारखेडा बुद्रुक रस्ता, सावरगाव ते ग्रा.मा. 67 ला जोडणारा रस्ता, हरीनगर ते कुंभारी बुद्रुक रस्ता, लोणी ते राहीरा रस्ता, मेंणगाव ते चिंचखेडा दिगर रस्ता, लोणी ते टाकळी पिंप्री रस्ता, कापूसवाडी ते तालुका हद्द (शिंदखेडा) रस्ता व गारखेडा खुर्द तालुका हद्द (मांडवे दिगर) रस्ता अशा एकूण 30.05 किमी लांबीच्या नऊ शेती रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळाला आहे. परिणामी रस्ते विकास योजना 2001-2021 मधील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत 35 किमीने वाढ होऊन एकूण लांबी 3529.75 किमी इतकी झाली आहे. ती ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या एकूण लांबीत 30.05 किमीने वाढ होऊन एकूण लांबी 6176.45 किलोमीटर इतकी झाली असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.