रावेरात दोन तोतया पोलिसांना अटक

रावेर, प्रतिनिधी। ट्रक चालकांना पोलीस असल्याचे सांगत त्यांच्याकडून पैशाची वसुली करणाऱ्या दोन तोतया पोलिसांना मंगळवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या गस्ती पथकाने पकडले असून दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मंगळवारी दिवसभर गणेश विसर्जन शांततेत आटोपल्यावर पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. गणेश विसर्जनानंतर पोलीस घरी असतील या कल्पनेने येथील स्वामी विवेकानंद चौकातील रहिवासी विनोद सताव व राहुल महाजन यांनी सावदा रोडवरील श्री फर्निचर दुकानाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक चालकांना अडवून त्यांच्याकडून पैशाची वसुली करीत होते.  त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक वाकोडे यांचे वाहन या ठिकाणावरून जात असतांना दोन जण पळून जात असल्याचे वाकोडे यांच्या निदर्शनास येताच वाहनातील त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, कर्मचारी भागवत धांडे, हर्षल पाटील, नंदू महाजन, श्री. मेढे, श्री सोपे यांनी या दोघांचा पाठलाग केला.

मात्र राहुल महाजन  मोटार सायकलवरून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तर अंधाराचा फायदा घेऊन श्री फर्निचरच्या मागील बाजूस लपून बसलेल्या विनोद सातव याला गस्तीवरील पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता वरील प्रकार उघडकीस आला. ट्रक चालकांनी या दोघांना ८०० रुपये दिल्याचे वाकोडे यांना सांगितले. दरम्यान पळून गेलेल्या राहुल याला रात्रीच त्याच्या घरून ताब्यात घेऊन दोघानाही अटक करण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयाने दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास एपीआय शीतल कुमार नाईक करीत आहेत.

Protected Content