Home Uncategorized अमळनेरमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक वंदे मातरम

अमळनेरमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक वंदे मातरम

0
102


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० वर्षानिमित्त सार्धशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग व संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सानेगुरुजी शाळेच्या मैदानावर तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे वंदे मातरम गायन करून देशभक्तीचा अनोखा जल्लोष साकारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा हे होते. यावेळी व्यासपीठावर प. पू. महंत ईश्वरदास महाराज, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, डीवायएसपी विनायक कोते, गटविकास अधिकारी एन.आर. पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पत्रकार बाबूलाल पाटील, खेळाडू मेघराज महाजन, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सौरभ उपासनी, प्रमुख वक्ते दिनेश नाईक, पंकज भावसार, आशिष चौधरी, दत्तात्रय सोनवणे, आयएमसी सदस्य बापू संदानशिव, प्रा. दिलीप भावसार, एपीआय जीभाऊ पाटील, प्रभारी प्राचार्य व्ही.पी. वाणी, विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, केंद्रप्रमुख रवींद्र पाटील व शरद सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर तिरंगी फुगे आणि ‘वंदे मातरम १५० वर्षे’ असा फलक आकाशात सोडण्यात आला. या क्षणी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी मैदान दुमदुमवून टाकले. नेमके सकाळी ९.५० वाजता तीन हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामूहिक वंदे मातरम गीत गायले. या वेळी वातावरण देशभक्तीने भारावून गेले.

मुख्य वक्ते दिनेश नाईक यांनी वंदे मातरम गीताचा अर्थ आणि त्यामागील राष्ट्रभावना यावर प्रकाश टाकत देश अखंड ठेवण्याचे आवाहन केले. अध्यक्ष तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी भाषणात देशभक्ती आणि एकतेची भावना जपण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली.

कार्यक्रमात वंदे मातरम गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये कोमल तेजी, ऋतिक मानके आणि रोशनी जाधव या विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळविल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सानेगुरुजी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास महसूल विभाग, पोलिस विभाग, शासकीय आणि खाजगी आयटीआय संस्था, किमान कौशल्य केंद्रे, सानेगुरुजी शाळा, जीएस हायस्कूल, डीआर कन्याशाळा, रोटरी क्लब, महिला हौसिंग ट्रस्ट आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे विद्यार्थी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नम्रता निकम यांनी बालविवाहमुक्त भारतासाठी सामूहिक शपथ घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही.पी. वाणी यांनी केले, सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार नम्रता निकम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ए.डब्ल्यू. दुसने, संजीव पाटील, अनिता बोरसे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound