प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ?


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरी सरकारकडून अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरच प्राप्त होणार आहे.

देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही थेट आर्थिक मदतीचा महत्त्वाचा आधार ठरली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षातून ₹६,००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. नोव्हेंबरमध्ये जमा होणारा २१ वा हप्ता रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या निधीचा उपयोग शेतकरी खत, बियाणे आणि कृषी साहित्य खरेदीसाठी करू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पूर व भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आधीच २१ वा हप्ता वितरित केला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा हप्ता जारी केला. या अंतर्गत ८.५५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ₹१७१ कोटी रुपये जमा करण्यात आले, ज्यामध्ये ८५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता.

आतापर्यंत जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ₹४,०५२ कोटींचा लाभ मिळाला आहे. या उपक्रमामुळे केंद्र सरकारची “शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत” ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. आता देशभरातील इतर राज्यांतील शेतकरी देखील नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.