नाशिक प्रतिनिधी । प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून (दि.14) बेमुदत संप पुकारला आहे. या बेमुदत संपामध्ये अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर नाशिकमधील ओझर आणि देशभरातील 9 प्रभागांतील जवळपास 20 हजार कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ही ५५ वर्ष जुनी कंपनी असून यामध्ये जवळपास २० हजार कर्मचारी आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, कोरपूत (ओदिशा), लखनऊ आणि नाशिक येथे हिंदुस्थान एरॉनेटिक्स कंपनीचे उत्पादन सुरू असते. तर, देशभरात चार ठिकाणी संशोधन केंद्र आहेत. एचएएलमध्ये लष्करी साहित्याची निर्मिती केली जाते. यामध्ये लढाऊ विमानांचा समावेश आहे. नाशिकमधील प्लांटमध्ये एसयू ३० या विमानांची निर्मिती सुरू आहे. दरवर्षी १२ विमाने तयार केली जातात. त्याशिवाय मिग-२१ आणि एसयू ३० या विमानांची देखभाल, दुरूस्तीची कामे करण्यात येतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी कारगिल युद्धात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या हवाई दलाच्या विमानांना दुरुस्तीसाठी नाशिक येथे आणण्यात आले आहे.
वेतन वाढ व इतर मागण्यांना घेऊन कामगार संघटनांनी याआधीच प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता. त्याशिवाय संप करणार असल्याचाही इशारा दिला होता. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील कामगार संघटनांच्यावतीने ३५ टक्के पगारवाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने ८ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव कामगार संघटनांसमोर मांडला असल्याची माहिती कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. त्याशिवाय अधिकारी आणि कामगारांना असलेल्या भत्त्यांमध्ये असमान वाढ असून अधिकारी आणि कामगारांना समान वाढ मिळाली पाहिजे अशी मागणी कामगार संघटनांनी दिली आहे. व्यवस्थापनाने चांगला वेतन करार देण्याच्या आश्वसनानंतर पाच वर्ष मुदतीच्या वेतन कराराची मागणी सोडून सर्व कामगार संघटना १० वर्ष मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या आहेत. परंतु त्यानंतर ही व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली असून अधिकारी वर्गाला ३५% इतकी वाढ दिलेली असतांना कामगार वर्गाला तुटपुंजी फक्त ८% वाढ देण्याचा अंतिम प्रस्ताव दिला असल्याची माहिती कामगारांनी दिली.