
शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी नगरपंचायत अंतर्गत विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदार यादीतील प्रलंबित मॅपिंग पूर्ण करण्यासाठी 23 मे 2026 आणि 24 मे 2026 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत नगरपंचायत शेंदुर्णी येथे हे शिबिर पार पडणार असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या मतदार नोंदीचे मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील अनेक नागरिकांचे मतदार यादी मॅपिंग अद्याप अपूर्ण असल्याने त्यांना या शिबिराच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरात केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष मॅपिंग प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
नागरिकांनी आपले ओळखपत्र, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित माहिती सोबत आणून वेळेत शिबिरात सहभागी व्हावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदार यादीतील अचूक माहिती ही लोकशाही प्रक्रियेसाठी महत्त्वाची असल्याने नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करताना, प्रलंबित मतदार मॅपिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दोन दिवस विशेष व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरातील पात्र मतदारांनी वेळ न दवडता शिबिरात सहभागी होऊन आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



