नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नीलम व्हॅलीत भारतीय सुरक्षा दलाकडून देण्यात आलेल्या जोरदार प्रत्युत्तरात १८ दहशतवादी आणि १६ पाकिस्तानी सैन्यांचा खात्मा झाला आहे. भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतीय जवानांनेही याला जशास तसे उत्तर दिले आहे.
भारतीय सुरक्षा एजन्सीने ही माहिती दिली असली तरी या कारवाईत नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला आहे, या संख्येला लष्कराकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाकिस्तानने भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतीय सीमारेषेवर गोळीबार केला होता. भारतीय सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात दहशतवादी संघटना ‘जैश ए मोहम्मद’ या संघटनेचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने केलेल्या कारवाईत १८ दहशतवादी ठार झाले असून पाकिस्तानचे १६ सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. भारताने ही कारवाई १९ व २० ऑक्टोबर रोजी केली आहे.