ईडीच्या ऑफीसमधून बोलत असल्याचे सांगून एकाची १५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील एका अभियंत्याला अज्ञात सायबर भामट्यांनी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टिळकनगर पोलीस स्टेशन मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्याविरुद्ध ईडी ऑफिसमध्ये तक्रारी दाखल झाले आहेत, तुम्हाला अटक होईल अशी भीती घालून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील ५० वर्षीय अभियंता यांच्या मोबाईल क्रमांकावरून बुधवारी २६ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासात बंद होईल असे सांगण्यात आले. फिर्यादीने कारण विचारले असता, तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून त्याबाबत मुंबई येथे तक्रारी दाखल झाले आहेत असे सांगण्यात आले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास त्यांना दुसरा फोन आला. पलीकडील व्यक्तीने टिळक नगर पोलीस स्टेशन मधील पोलीस इन्स्पेक्टर विनायक बाबर बोलत असल्याचे सांगितले.

तुमच्याविरुद्ध टिळक नगर पोलीस स्टेशन मुंबई येथे तक्रार दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर फिर्यादीला विविध कागदपत्रे मागण्यात आले. फिर्यादीने कागदपत्रे पाठवल्यानंतर त्यांना खरे वाटावे म्हणून संशयित आरोपींनी त्यांना इडी ऑफिसचे बनावट पत्र पाठविले. तसेच वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत कॉन्फरन्स मध्ये घेण्याची बतावणी करीत सांगितले की, तुमच्याविरुद्ध ईडी कार्यालयात तक्रार नोंद झाली आहे. तुमच्या नावाचे पकड वॉरंट असून हा प्रकार थांबवायचा असेल तर तुम्हाला तर काहीतरी रक्कम भरावी लागेल. अशा शब्दात पलीकडील संशयित आरोपीने फिर्यादीला दम भरला.

त्यानंतर विनायक बाबर नामक व्यक्तीने त्याचे बंधन बँकेचे खाते क्रमांक पाठविले. नंतर दुपारी १२.३० वाजता फोन करून सांगितले की, आत्ताच बँकेत जाऊन पैसे भरा. नाहीतर तुम्हाला अटक होईल. त्यानुसार फिर्यादीने भीतीपोटी त्याच्या कॉसमॉस बँकेच्या खात्यातून विनायक बाबर नामक व्यक्तीच्या बंधन बँकेच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये आरटीजीएसमार्फत भरले. मात्र नंतर फिर्यादी प्रचंड घाबरला होता. त्याने त्याच्या परिवाराला, मित्रांना सांगितले असता त्यांनी तुमची कोणीतरी फसवणूक करत असल्याचे सांगून सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविण्यास सांगितले. नंतर २७ जून रोजी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे अभियंत्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करीत आहे.

Protected Content