ट्रक चालक व क्लिनरला लुटणारे पाच संशयित अटकेत; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । वाकोद शिवारातील वाघूर नदीच्या पुलाजवळ ट्रक आडवून चालक व क्लिनरला लुटणाऱ्या पाच संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, गुरुवार, दि.३० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाकोद शिवारातील वाघूर नदीच्या पुलाजवळून जळगावच्या दिशेने रिकामी ट्रक (एमएच १९ सीवाय ६३८६) येत होती. त्यावेळी दोन मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात लुटारूंनी ट्रक अडविला

ट्रकचालक व क्लिनर या दोघांना त्यांनी मारहाण करत त्यांच्याजवळ असलेले २ मोबाईल जबरीने हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे रिकाम्या ट्रकलाच अडवून लूट करत असल्याबाबत अभ्यास केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. तपासाअंती त्यांच्या असे लक्षात आले की, ‘भाग्यश्री पालीमर्स, उमाळा या कंपनीच्या ट्रकचालकांकडे माल रिकामा केल्यानंतर त्यांच्याकडे मोठया प्रमाणात मालाचे रोख पैसे असतात. त्यामुळे या रिकाम्या ट्रकला त्यांनी आपले टार्गेट केले असावे’ अशी पोलीस तपास पथकाला शंका आली. त्या दृष्टीने तपास करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि.अमोल देवढे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, पोना रणजित जाधव, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ विनोद पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, चापोकॉ मुरलीधर बारी या पथकाने लुटलेल्या रिकाम्या ट्रकच्या कंपनीस भेट देवून तेथे काम करणा-या कामगारांची माहिती घेतली. तोंडापूर व वाकोद परिसरातील ट्रक चालकांची गोपनिय माहिती काढण्यात आली. त्यानुसार काही संशयीत इसमांचे फोटो प्राप्त करण्यात आले. ते फोटो फिर्यादीस दाखवले असता त्यातील एका इसमास फिर्यादीने ओळखले. पो.नि. किरणकुमार बकाले यांनी खबरी नेमून त्यांना फिर्यादीने ओळखलेल्या अज्ञात आरोपीचा फोटो दाखवत पुढील तपासाला सुरुवात केली. फिर्यादीने ओळखलेला इसम व त्याचे साथीदार असे गोद्री ता.जामनेर गावावरुन फत्तेपुरच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथक फत्तेपुरच्या दिशेने रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फत्तेपूर येथे सापळा रचत संशयीतासह एकूण पाच साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनी आपला गुन्हा कबूल करत गुन्हयांत हिसकावून चोरी केलेले सोळा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल काढून दिले. गुन्हयात वापरलेल्या हिरो फॅशन व बजाज पल्सर या दोन मोटार सायककल तपासकामी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Protected Content