नवी दिल्ली: वृत्तसंस्था । मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच आतापर्यंत 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मोदी मंत्रिमंडळात 43 नव्या मंत्र्ंयांचा समावेश होणार आहे.
नव्या विस्तारात कुणाला संधी मिळणार यापेक्षा कोण मंत्री घरी गेलं याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
दिल्लीत आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 7 रेसकोर्स हे निवासस्थान या राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं आहे. ज्या संभाव्य नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यांच्याशी मोदींनी आज संवाद साधला. सरकारची कामे, देशाची आणि राज्यांची परिस्थिती, आव्हाने आणि नव्या मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मोदींनी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला.
मोदींच्या घरी सुरू असलेल्या या मिटिंगवर कोण मंत्री होणार? यावर चर्चा रंगली होती. अनेक नेत्यांची नावंही चर्चेत आली होती. त्याचवेळी मोदींची या नेत्यांसोबतची मिटिंग संपली. त्यानंतर लगेचच काही मंत्र्यांना फोन गेले आणि लगेचच मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्रं सुरू झालं, असं सूत्रांनी सांगितलं. तब्बल 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे नवीन मंत्री कोण होणार? यापेक्षा कुणाला घरी जावं लागलं याचीच चर्चा रंगली.
रमेश पोखरियाल निशंक , संतोष गंगवार , देबोश्री चौधरी , संजय धोत्रे , बाबुल सुप्रियो , रावसाहेब दानवे-पाटील , सदानंद गौड़ा , रतन लाल कटारिया , प्रताप सारंगी , डॉ हर्षवर्धन , अश्विनी चौबे , थावरचंद गहलोत यांनी राजीनामे दिले
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या खात्यात बदल होणार असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात हर्षवर्धन यांना अपयश आल्याने त्यांच्याकडून आरोग्य खातं काढून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. आरोग्य खात्याची जबाबदारी अनुभवी नेत्याकडे देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.
आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण लोकसभा खासदारांच्या संख्येच्या 15 टक्के मंत्र्यांचा समावेश असावा, असा नियम आहे. सध्याच्या लोकसभेत 552 खासदार आहेत. त्यानुसार आकडेमोड केल्यास केंद्रीय मंत्रिमंडळात 82 पेक्षा जास्त नेत्यांना घेता येणार नाही. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहेत. त्यामुळे आणखी 29 मंत्र्यांचा नव्याने समावेश करता येईल. उर्वरित नेत्यांच्या समावेशासाठी काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरच रस्ता दाखवला जाईल. भाजपमध्ये संघटनात्मक पदांवर वर्णी लावून त्यांचे पुनर्वसन करता येईल.