फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तब्बल ३ लाख १६ हजार रुपयांचे १०० भरलेले गॅस सिलेंडर चोरीस गेल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपूर शहरातील रहिवाशी असेलेल ललीत रघुनाथ राणे वय ५५ यांचे पिंपरूळ शिवारात श्रीधर गॅस एजन्सी गोडाऊन आहे. या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने १०० भरलेले सिलेंडर लंपास केले. विशेष म्हणजे चोरट्यांनी कोणताही संशय न येऊ देता ही चोरी केल्याने यामागे टोळी कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा प्रकार शनीवारी २५ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता उघडकीला आला. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे हे करीत आहे.




